अमरावती (प्रतिनिधी)- अमरावती शहराला कला व संस्कृतीची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे जुन्या पिढीतील कलावंतांनी आजतागायत हा वारसा जोपासून अमरावतीचे सांस्कृतिक क्षेत्र आधी समृद्ध केले आहे. त्यामुळे आजच्या नवीन उदयोन्मुख कलावंतांनी सुद्धा अमरावतीचा सांस्कृतिक वारसा जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केले. गुढी पाडवा निमित्य प्रशांत डवरे मित्र मंडळ व शिव संकल्प प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने कठोरा नाका स्थित स्वामी विवेकानंद थीम पार्क येथे आयोजित जाहीर सत्कार सोहळा व सांज पाडवा कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अमरावतीच्या आमदार-सौ. सुलभाताई खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे , माजी महापौर ऍड. किशोर शेळके, सौ.रीनाताई नंदा, माजी मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ. भोजराजजी चौधरी, गझलरत्न डॉ. राजेश उमाळे,शिव संकल्प प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष गजानन पागृत, होलीपीस इंग्लिश हायस्कुलचे संचालक शैलेश अमृते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेवर नवनिर्वाचित झाल्याबद्दल आ.संजय खोडके यांचा भव्य पुष्पहाराने जाहीर सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना आ.संजय खोडके म्हणाले की,कुठलेही पद व कामामुळे आपले कर्तव्य व जबाबदारी वाढत असते. आजपर्यंतच्या आपल्या प्रत्येक कार्यात सर्व सहकारी व आपल्या माणसांची साथ लाभली आहे. यातूनच समाजाप्रतीचे ऋण फेडण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळत असून पुढेही अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित आ.संजय खोडके यांनी दिली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की, गुढी पाडव्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे हाएप्रिल महिना विविध धर्मांचे सण -उत्सव व जयंत्याचे महिना असून हेच उत्सव आपल्या भारतीयांच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडवतात. यातून सामाजिक सद्भावना प्रस्तापित असल्याने नवीन वर्षात आपल्या जीवनात सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृती आणून आपण आपले जीवन सुंदर बनवू शकतो. असे सांगून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.संजय खोडके व आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने अमरावतीचा सर्वांगीण विकास अधिक गतिमान होणार असल्याचे सांगितले. तसेच सांज पाडवा च्या आयोजनातून अमरावतीचे सांस्कृतिक क्षेत्र अधिक प्रगल्भ करण्याचा उद्देश असल्याचे सुद्धा प्रशांत डवरे यांनी सांगितले. यावेळी सुप्रसिद्ध गायक व संगीतकार गझलरत्न डॉ.राजेश उमाळे यांनी हिंदी-मराठी गीतांचा संगीतमय अविष्कार प्रस्तुत करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या बहारदार संगीत मैफिलीत त्यांना प्रसिद्ध निवेदक नितीन भट सह गायिका शीतल भट, तेजस कडू,ईश्वर कांबळे आदी कलावंतांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे संचालन संदीप जुनघरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी विशाल भगत, निलेश ठाकरे , प्रज्वल घोम, सागर इंगळे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments