Ticker

6/recent/ticker-posts

युवकांना मारहाण करणाऱ्या ठाणेदाराला निलंबित करा – शिवसेना नेते श्रीरंग पिंजरकर यांची मागणी

 




अकोला – लोहारा येथे दोन युवकांना शिवाजी महाराजांचे स्टेटस ठेवले म्हणून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांनी शनिवारी (दि. २२ मार्च) लोहारा येथे भेट देऊन मारहाणग्रस्त युवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गोपाल ढोले यांनी पक्षपातीपणे कारवाई करून निर्दोष युवकांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत त्यांनी गोपाल ढोले यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याकडे केली.

पिंजरकर म्हणाले की, पोलीस प्रशासनाने एका गटाला अभय देऊन दुसऱ्या गटावर अन्याय केला आहे. शिवसेना हा अन्याय सहन करणार नाही. जर संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई झाली नाही, तर शांतता भंग झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल. लोहारा गावात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

गावकऱ्यांच्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पोलिसांनी दोन युवकांना घरातून उचलले. त्यांना उरळ येथे नेत असताना आरा मशीन परिसरात एकांतात नेऊन पट्टे व दंडुक्याने बेदम मारहाण करण्यात आली. याशिवाय "तुमच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकू" अशी धमकीही देण्यात आली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर युवक कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसून विद्यार्थी आहेत. तरीही त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. ही घटना पक्षपाती असून, सुनियोजित कटाचा भाग आहे.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "सदर युवकांना मी मारहाण केलेली नाही. त्यांच्याशी कोणताही अन्याय झालेला नाही. पोलिसांवर खोटे आरोप लावले जात असून, जर माझ्यावर दोष सिद्ध झाला, तर मी नोकरीचा राजीनामा देईल."

Post a Comment

0 Comments