शंकर जोगी अकोला : महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील "औरंगाबाद" शहराचे नाव बदलून "छत्रपती संभाजीनगर" तर "अहमदनगर"चे "अहिल्यानगर" असे केले असून त्यालाही बराच काळ उलटून गेलेला आहे ; मात्र अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील शासनाचा लाखो रुपये पगार घेऊनही "मुघलांची गुलामी" करण्याची मानसिकता असलेल्या विद्यमान "शिवशाहीच्या सरदारांनी" अजूनही रस्त्यांवर लागलेल्या दिशादर्शक फलकांवरून "औरंगाबाद" व "अहमदनगर" हे नाव हटविले नाही.आता ह्याला काय म्हणावे.?
इंग्रज भारतातून गेलेत परंतु आपले वारस इथेच सोडून गेलेत असे म्हटल्या जाते. त्याचप्रमाणे "मोगलाई" संपली परंतु त्यांच्या "औलादी" अजूनही जिवंत असून ते आपल्या "बापजाद्यां"चे नाव व वारसा अत्यंत इमानदारीने चालवित असल्याचे इतरत्र कुठे नसले तरी महाराष्ट्रात चित्र आहे.
हैद्राबाद वरून निघून मध्यप्रदेशात जाणारा व तीन राज्यांना जोडणारा राज्य महामार्ग अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातून जातो. अकोट शहराच्या बाहेर खाई नदीच्या पुला जवळच ह्या रस्त्यावर अंदाजे ३० ते ३५ फुटाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले असून त्या फलका वर आजही "औरंगाबाद" व "अहमदनगर" ही नावे कायम असून ते येणाऱ्या जाणाऱ्यांना सतत "वाकुल्या दाखवून डीवचण्या"चे काम करीत आहेत.१६८ क्रमांकाचा हा राज्य महामार्ग असून ह्या विभागाचे जिल्हा कार्यालय अकोल्यातील बांधकाम विभागाच्या परिसरातच आहे तर विभागीय कार्यालय अमरावतीला आहे. अकोटपासून परतवाडा पर्यंत ह्या महामार्गाचे काम कोरोना काळातच पूर्ण झाले असून ह्या मार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली आहे.मध्यप्रदेशातून अकोट मार्गे दररोज हजारो प्रवासी व वाहने दररोज ये जा करीत असतात. हे कुणाला नव्याने सांगण्याची गरज नाही.
"औरंगाबाद" शहराचे नाव "छत्रपती संभाजीनगर" व "अहमदनगर"चे "देवी अहिल्यानगर" असे करण्याबाबत शासनाच्या वतीने अध्यादेश काढण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यातील जनतेने याची नोंद घेतली आहे. एस. टी.महामंडळाने आपल्या बसेसवरील पाट्या सुद्धा त्याचवेळी बदलल्या होत्या तर ज्या ठिकाणी औरंगाबाद ह्या नावाचा उल्लेख होता त्या सर्वच ठिकाणी "छत्रपती संभाजीनगर" व "देवी अहिल्यानगर" अशी नावे बदलून घेतली आहेत.मात्र अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरातील ह्या दिशादर्शक फलकावरील नाव बदलण्याची ह्याच "मुघल बादशहा औरंगजेबाच्या मुगलाईचा वारसा" जपणारांना काहीच गरज वाटली नसावी. असेच आजतरी नाईलाजाने म्हणावे लागत आहे.
राज्य शासनाचे हजारो अधिकारी, आमदार व खासदार ह्या मार्गाने सतत येत जात असतात, मात्र त्यांनीही ह्या गंभीर बाबतीत गेल्या दोन वर्षांपासून काहीच दखल घेतली नाही ही आश्चर्याची बाब आहे.ज्यांनी "औरंगाबाद" हे नाव बदलून "छत्रपती संभाजीनगर" "अहमदनगर"चे "देवी अहिल्या नगर" असे नामकरण करण्यासाठी जिवाचे रान केले आज त्याच पक्षाचे आमदार ह्या अकोट मतदार संघातून तिसऱ्यांदा प्रचंड नव्हे तर "महाप्रचंड मतां"नी निवडून आले आहेत.गेल्या निवडणुकीत ते ह्या मतदार संघात मते मागण्यासाठी फिरले तेव्हाही ही बाब त्यांच्या लक्षात आली नसेल असे म्हणता येईल काय.? निवडणुकीत मतांच्या "लाचारी"साठी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले नसेल.परंतु आता निवडणुका होवून देखील चार ते पाच महिने होत आहेत,तरी देखील त्यांनी ह्या "मुघल बादशहा औरंग्याच्या गुलामीची मानसिकता" दाखविणारे फलक बदलून घेतले नाही ह्याला काय म्हणणार.?
ठीक आहे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हे सुचले नसेल.परंतु अकोटच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आपली "सल्तनत" निर्माण करून त्यावर "राज" करणारे उपअभियंता सुलतान यांच्या तरी हे लक्षात यायला पाहिजे होते.मात्र त्यांनीही आपली "जहागिरी" कायम ठेवण्यासाठी म्हणा वा "मानसिकता" दाखवित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे "मोगलाई" बुडून तीन साडे तीनशे वर्षे झालीत तरी "गुलामीची मानसिकता" कायम असल्याचे दाखविण्याचा हा प्रकार लाखो शिवप्रेमींच्या "छाताडावर बसून" सुरूच आहे.
अकोट शहर हे राज्यशासनाच्या गृहविभागाच्या रेकॉर्डवर "अति संवेदनशील" शहर म्हणून नोंदल्या गेले आहे.ह्या मतदार संघातून सतत हिंदुत्ववादी पक्षाचे आमदार निवडून येत आहेत.जातीय दंगलींसाठी उभ्या,आडव्या महाराष्ट्रात अकोट शहर "कुप्रसिद्ध" आहे.ह्या सगळ्या बाबींची माहिती असूनही राज्य शासनाच्या महसूल,गृह व बांधकाम विभागाचे अधिकारी खरोखरच झोपेत आहेत की "झोपेचे सोंग" घेत आहेत.हा ही एक संशोधनाचा विषय आहे.
महसूल हे आज रोजी राज्यातील "बिग बॉस" डिपार्टमेंट आहे.ह्या विभागातील एस.डी.ओ.तसेच तहसीलदार व नायब तहसीलदार हे कार्यकारी दंडाधिकारी आहेत. "कायदा व सुव्यवस्था" सांभाळण्याची व ती कायम ठेवण्याची जबाबदारी पोलिसांसोबतच ह्या अधिकाऱ्यांची सुध्दा आहे.मग गेल्या वर्ष,दोन वर्षांत हा "३०/३५ फुटाचा अख्खा रस्ता" व्यापून घेणारा फलक ह्या अधिकाऱ्यांना देखील दिसला नसेल असे म्हणताच येत नाही. तर गुलामगिरीची मानसिकता असल्याने व ती दाखविण्याची संधी मिळाल्याने ती का सोडावी अशाच मानसिकतेने हा फलक बदलण्याचे "निर्देश" आजपर्यंत तरी दिल्या गेले नाहीत,असे म्हणायला भरपूर "वाव" आहे.
हा फलक अकोट नगर पालिकेच्या हद्दीत येतो की नाही हा जरी "अधिकार क्षेत्राचा" आणि आपल्या वरील "घोंगडे" झटकण्याचा विषय असला तरी ह्याच फलकावरून "दिशा ज्ञान" घेऊन हजारो प्रवासी व वाहनचालक शहरातून जात असतात आणि शहराची व्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे काम नगर पालिका ही स्थानिक संस्था पाहते.अकोट नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.नरेंद्र बेंबरे ह्यांना नुकताच राज्यस्तरीय असा एक "फार मोठ्ठा पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. अकोटच्या विकासासाठी व नावलौकिक वाढविण्यासाठी गेल्या दोन वर्षांत त्यांनी आजही प्रत्यक्षात "डुकरांना" देखील फिरायची लाज वाटेल अशा ह्याच शहरांत "अतिप्रचंड" असे "मांडीला नेट लावून" काम केल्याचा "डांगोरा पिटल्या" जात असताना,त्यांच्याच शहरांत येत असताना "मोगली मानसिकता" दर्शविणारे फलक गेल्या दोन वर्षांपासून अकोटकरांच्या नव्हे तर लाखो शिवप्रेमींच्या "छाताडावर" ऐटीत मुघल बादशहा व त्याच्या "जुलमी सरदारा"चे नाव दाखवित दररोज ये जा करणाऱ्यांना "डिवचत" आहे. औरंगाबाद व अहमदनगर ही नावे कायम ठेवून संबंधित अधिकारी "माथेफिरू बादशहा औरंगजेब" व "जुलमी सरदार अहमद शहा" ह्या दोघांचा "वारसा" तर जपत नाहीत ना अशी शंका येते.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्यावर तासन्तास भाषणे देणारे अमोल मिटकरी हे आज राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणजेच आमदार आहेत. त्यांचा पक्ष आज सत्तेत सहभागी आहे.परंतु त्यांच्याच तालुक्यात "छत्रपती संभाजी राजे व अहिल्यादेवी होळकर" ह्यांचा धडधडीत "अपमान होत असताना ते काय करीत आहेत.? हा "लाख मोला"चा सवाल आहे.
दरवेळी येणाऱ्या निवडणुका व दरवर्षी साजरी केल्या जात असलेल्या शिवजयंतीला अकोट शहरातील लोकांचा "उत्साह ओसंडून" वाहत असतो.नव्हे त्याला कधीकधी पोलिसांना आवर घालावा लागतो,अशी परिस्थिती आहे. मात्र गेल्या वर्ष दोन वर्षांपासून बस स्थानकातील फलकांवरील औरंगाबाद हे नाव बदलण्यासाठी आगार व्यवस्थापकाला निवेदन देणाऱ्या "शिवप्रेमींना" अंजनगाव मार्गावरील "औरंगाबाद" व "अहमदनगर" हे नाव दाखविणारे फलक दिसले नसेल काय.? शिवप्रेमींनो विषय तुमच्या "मान सन्माना"चा नाहीच तर तो "हिंदवी स्वराज्य" व "हिंदुत्वा"साठी औरंगजेबाने हाल हाल करून मारलेल्या छत्रपती संभाजी राजेंच्या "स्वाभिमाना"चा व मराठ्यांचे साम्राज्य दिल्लीच्या "तख्ता"पर्यंत पोहोचविणाऱ्या एका स्वकीय व परकीय शत्रूंशी लढणाऱ्या "निर्भय विरांगणेच्या अस्तित्वाचा" आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आंदोलनाची भाषा करणारे, केवळ हिंदुत्वासाठी अमरावती जिल्ह्यातील व्यक्तीला "तीन तीन वेळा" आमदार म्हणून प्रचंड मतांनी निवडून देणाऱ्या अकोट मतदार संघातील मतदारांना, स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या, हाल हाल करून मारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी राजे यांच्या ह्या "जाणीवपूर्वक" केल्या जात असलेल्या "अपमाना"ची जराही जाणीव होऊ नये.हे कशाचे लक्षण आहे.? "छावा" हा चित्रपट पाहून "फुटे पर्यंत छाती फुगविणारां"ना त्याच "छाव्या"चा होत असलेला हा अपमान पाहून काहीच कसे वाटत नाही.? प्रात:स्मरणीय व पूजनीय असणाऱ्या "देवी अहिल्ये"चा अपमान होत असताना एरव्ही थोड्या थोड्या गोष्टींवर पेटून उठणारा धनगर समाज इतका शांत का.? याचेच आश्चर्य वाटते.
दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाने ह्या दोन्ही शहरांची नावे बदलण्याचा अध्यादेश काढून त्याची अंमल बजावणी देखील केली असताना अकोट शहरात जाणीवपूर्वक जुनेच "औरंगाबाद" व "अहमदनगर" ही नावे कायम ठेवून अकोट शहरातील संबंधित विभागांचे जबाबदार अधिकारी यांना नेमके काय सांगायचे आहे वा काय सिद्ध करायचे आहे.? हे कळण्यास कोणताही मार्ग नाही. इतकेच काय तर हिंदुत्वाच्या केवळ गप्पा मारणाऱ्या,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्यासाठी जीव देखील देण्याची भाषा करणाऱ्या "शिवप्रेमी"ना देखील त्यांच्या "छाताडा"वर गेल्या दोन वर्षांपासून "ऐटीत उभ्या" असलेल्या ह्या फलकाचे काहीच कसे वाटत नाही.?आश्चर्याची बाब आहे.
0 Comments