प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये संताप
पत्रकारांच्या उपस्थितीनंतरच मंदिराचे दरवाजे खुले
अकोला ) – ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी मोरगाव काकड येथील श्री निरंजन महाराज देवस्थान कुलूपबंद ठेवल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. सकाळी सात वाजल्यापासून दर्शनासाठी जमलेल्या महिलांनी मंदिरासमोर ठिय्या आंदोलन छेडले, मात्र जबाबदार व्यक्ती मंदिरावर उपस्थित नसल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पत्रकार मंदिरस्थळी पोहोचताच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले, यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले. मात्र, महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी अशा प्रकाराने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवस्थान ट्रस्टमधील अंतर्गत वादामुळे अध्यक्ष संजय सुखदेवराव काकड यांनी मंदिराला कुलूप लावले होते. त्यांनी रात्रीपासूनच मंदिर बंद ठेवल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी देखील मंदिर उघडले गेले नाही, यामुळे सकाळपासूनच संतप्त भाविकांनी मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या संख्येने महिला आपल्या पूजेचे साहित्य घेऊन मंदिरासमोर बसल्या होत्या. मात्र, जबाबदार व्यक्ती मंदिरावर हजर नसल्याने उन्हाच्या कडाक्यात भाविक महिलांनी तासनतास धीर धरला.
या प्रकाराची माहिती पत्रकार प्रदीप गावंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश गावंडे यांना मिळताच ते मंदिरस्थळी पोहोचले. त्यांनी महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
तत्पूर्वी, भाविकांनी पोलिस ठाण्यातही संपर्क साधला होता, मात्र ठोस कारवाई झाली नाही, असे काही महिलांनी सांगितले. पत्रकारांनी मंदिरस्थळी येताच अध्यक्ष संजय काकड यांना याची माहिती मिळाली. त्यांनी एका कर्मचाऱ्याच्या मार्फत मंदिराच्या चाव्या पाठवून दरवाजे उघडण्याचे आदेश दिले.
भाविकांचा आनंद, पण प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मंदिर उघडताच भाविक महिलांनी मोठ्या आनंदाने दर्शन घेतले व महाशिवरात्रीची पूजा केली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. मात्र, महाशिवरात्रीसारख्या मोठ्या सणाच्या दिवशी भाविकांची होणारी ही गैरसोय आणि प्रशासनाची उदासीनता संतापजनक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अध्यक्षांचे स्पष्टीकरण
या संदर्भात अध्यक्ष संजय काकड यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, "नेहमीप्रमाणेच आम्ही रात्री मंदिर कुलूपबंद केले होते. सकाळी एका महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्यामुळे मंदिर उघडण्यास उशीर झाला."
मात्र, भाविकांनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी गावकऱ्यांनी ठोस नियोजन करण्याची मागणी केली आहे.
भाविकांची मागणी: भविष्यात असे होऊ नये!
महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण बार्शीटाकळी तालुक्यात नाराजीचा सूर उमटला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने आणि ट्रस्टने योग्य तो समन्वय साधावा, तसेच कोणत्याही कारणास्तव भाविकांची गैरसोय होऊ नये, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
0 Comments