अकोला, दि. 14 फेब्रुवारी: जिल्ह्यात Guillain Barre Syndrome (G.B.S.) या दुर्मिळ आजाराचे पाच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी कार्याल याकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2025 रोजी या आजाराची पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
G.B.S. म्हणजे नेमकं काय?
Guillain Barre Syndrome (G.B.S.) हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच नसा (nerves) कमजोर करते. यामुळे हातपाय अशक्त होणे, स्नायूंमध्ये दुखणे, चालण्यात त्रास, श्वास घेण्यास अडचण, बोलण्यात अडथळा अशी लक्षणे दिसतात. हा आजार अचानकपणे उद्भवतो आणि रुग्णाची प्रकृती झपाट्याने खालावत जाते.
रुग्णांवर तातडीने उपचार सुरू
जिल्ह्यात आढळलेल्या पाचही रुग्णांवर तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), अकोला आणि खटखटी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत.
आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तसेच सर्व शासकीय रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
स्वच्छता पाळावी.
पाणी उकळून प्यावे.
सर्दी, ताप, अशक्तपणा, हातपाय सुन्न होणे किंवा चालण्यात त्रास वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.
प्रशासनाचे आवाहन:
सर्व नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. G.B.S. आजाराचे कोणतेही लक्षण आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा.
उपचारासाठी संपर्क:
1. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
2. खटखटी शासकीय रुग्णालय
0 Comments