शंकर जोगी विदर्भदूत वृत्त
अकोला:शासकिय कामकाजात नेहमीच दिरंगाई करीत असल्याचा ठपका ठेवत अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांना शासन सेवेतून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. हे आदेश महसूल व वन विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी ११ फेब्रुवारीलाच काढले आहेत. निवडणुकीच्या कामात हयगय करणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या कामात अक्षम्य दिरंगाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात गौण खनिज उत्खनन व वाहतुकीचे प्रकारात फार मोठ्या प्रमाणांत वाढ झाल्याचा आरोप देखील होत आहे.
मोर्शीचे राज्य सभेतील खासदार डॉ.बोंडे यांनी तहसीलदार राहुल पाटील यांची राज्य शासनाकडे गेल्याच महिन्यात तक्रार केली होती.ही तक्रार महसूल विभागाने अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे चौकशीसाठी दिली होती.त्यावर त्यांनी सादर केलेल्या अहवालावरून राहुल पाटील यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाच्या अग्रक्रमातील विषयाना प्राधान्य न देता स्वतःच्या मर्जीने कामकाज करून शासकीय योजनांचा योग्य पाठपुरावा न करता दफ्तर दिरंगाई करीत असल्याचे तसेच कार्यालयीन शिस्त पाळत नसून त्यांचा बेजबाबदार कारभार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तहसीलदार राहुल पाटील यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघनाबाबत ही ठपका आहे. त्यांच्याविरुद्ध लवकरच विभागीय चौकशी सुरू होणार असल्याचे संकेत असून त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची फेरतपासणी होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. होण्याची शक्यता आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय राहणार आहे.
0 Comments