Ticker

6/recent/ticker-posts

मधमाशांचा हल्ला रोखण्यासाठी मातेने दिली प्राणांची आहुती! जिथे सर्व हतबल झाले, तिथे मातेने दाखवली धाडस

 


मातृस्नेहाचा सर्वोच्च बलिदान

विठ्ठल महल्ले /अकोला:- शेतकऱ्यांचे जीवन सतत अस्मानी आणि सुलतानी संकटांशी झुंज देत असते. कधी अवकाळी पाऊस, गारपीट तर कधी आर्थिक संकटं—शेतकरी कुटुंबं नेहमीच या संघर्षात असतात. मात्र, बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे घडलेली ही घटना केवळ एक दुर्दैवी आपत्ती नसून मातेच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि धाडसाचा अचंबित करणारा प्रत्यय आहे. आपल्या दोन चिमुकल्या कन्यांना वाचवताना एका मातेला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, आणि संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात बुडून गेले.

मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रकाश पांडुरंग पवार (५५) या अल्पभूधारक शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब वरखेड शिवारातील आपल्या दोन एकर शेतात गेले होते. अतिश पवार (३७) आणि त्यांची पत्नी रेश्मा (३२) आपल्या सात वर्षीय नियती आणि पाच वर्षीय मेहक या मुलींना घेऊन शेतात पोहोचले. त्याच वेळी, गावात राहणारे कुटुंबातील इतर सदस्य कावेरी राठोड (१८), सेजल आणि धनंजय देखील शेताकडे निघाले.

शेतात हरभरा खात असताना, अचानक एका बिहाळाच्या झाडावर असलेल्या आगेमोहाच्या मधमाशांनी मोठ्या संख्येने कुटुंबावर हल्ला चढवला. असंख्य मधमाशांनी अचानक अंगावर झेप घेतल्याने सर्वांची तारांबळ उडाली. जो मिळेल त्या दिशेने लोक पळू लागले, पण लहानग्या मुलींना आपला बचाव करणं शक्य नव्हतं.

संकट क्षणात ओळखणाऱ्या रेश्मा पवार यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता मुलींच्या सुरक्षेसाठी झगडण्याचा निर्णय घेतला. त्या झपाटल्यासारख्या धावत गेल्या आणि शेतात पडलेला एक मोठा प्लास्टिकचा ताडवा उचलला. त्यांनी त्वरित नियती आणि मेहकला त्याखाली लपवले. दोन्ही मुली सुरक्षित झाल्या, पण आता संपूर्ण हल्ला रेश्मा यांच्यावर झाला.

अडीचशे ते तीनशे मधमाशांनी त्यांच्या शरीरावर हल्ला केला. त्या इतक्या वेदनांनी तडफडू लागल्या, तरीही त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेजारच्या शेतात असलेल्या पतीच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या साडीचा पदर अडकला आणि त्या खाली कोसळल्या. त्यानंतर मधमाशांनी त्यांना अक्षरशः झडप घातली.

गंभीररीत्या जखमी झालेल्या रेश्मांना वाचवण्यासाठी आजूबाजूचे लोक धावले, पण मधमाशांच्या भयानक हल्ल्यामुळे कोणीही पुढे येऊ शकत नव्हते. अखेर काही वेळाने मधमाशांचा रोष कमी झाल्यावर, पती आणि गावातील लोकांनी धावत जाऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार मिळण्याआधीच त्या जगाचा निरोप घेतला.

.....शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

रेश्मा पवार यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाने संपूर्ण गाव हादरून गेले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उशिरा काजळेश्वर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या या त्यागाने संपूर्ण गाव हेलावून गेला असून, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.अया घटनेत पती अतिश पवार, सासरे प्रकाश पवार, आणि काही इतर लोकही जखमी झाले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच दगडपारवा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विशाल गावंडे, बार्शीटाकळीचे तहसीलदार राजेश वजिरे आणि तलाठी पळसपगार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी गावकरी व नातलगांनी पवार कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले.

.....एका आईच्या प्रेमाचा विजय

ही घटना केवळ एक अपघात नाही, तर मातृत्वाच्या सर्वोच्च बलिदानाची कहाणी आहे. जेव्हा संपूर्ण कुटुंब हतबल झाले, तेव्हा रेश्मा पवार यांनी स्वतःचा जीव देऊन आपल्या मुलींना जीवनदान दिले. त्यांच्या धाडसाने आणि मातृत्वाने संपूर्ण समाजाला एक संदेश दिला आहे—मातेच्या प्रेमापेक्षा मोठं काहीही नाही.गावात आता एकच चर्चा आहे—आई गेली, पण आपल्या लेकरांना वाचवून गेली!

Post a Comment

0 Comments