शंकर जोगी २१फेब्रु./विदर्भदूत वृत्त
अकोला : जिल्ह्यातील पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांचा विश्वासू पोलिस कर्मचारी आज अकोला एसीबीने केलेल्या कारवाईच्या जाळ्यात अडकला आहे.
पातूर तालुक्यातील दारू विक्रीचा धंदा करणाऱ्या तक्रारदारावर तडीपारी व एमपीडीए सारखी प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर प्रत्यक्षात तीन हजार रुपये स्वीकारत असताना पातूरच्या ठाणेदाराचा विश्वासू असलेला पवन भाकरे नामक पोलिस कर्मचाऱ्याला आता आज काही वेळापूर्वी रंगेहात पंचांसमक्ष पकडण्यात आल्याने पातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पातूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहत असलेल्या तक्रारदाराला दारू विक्रीच्या धंद्यातून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल असल्याने त्याच्यावर तडीपारी व एमपीडी ची कारवाई न करण्यासाठी पोलिस कर्मचारी पवन भाकरे याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती.मात्र प्रत्यक्ष भेटीत त्या रकमेत तडजोड करून तीन हजार रुपये स्वीकारण्यास सदरहू पोलिस कर्मचाऱ्याने संमती दिली होती.असे तक्रारीच्या पडताळणीत स्पष्ट झाल्याने सापळा कारवाई करण्यात आली होती.
आज काही वेळापूर्वी पातूर शहरातच याबाबत सापळा रचण्यात आला होता.त्यात सांगितलेल्या ठिकाणी व दिलेल्या वेळेवर पवन भाकरे ह्याला तीन हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ जाळ्यात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पातूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सदरहू कारवाई अकोला एसीबीचे पोलिस उपअधीक्षक मिलिंद बहाकार यांच्या मार्गदर्शनात अमरावती युनिटचे पोलिस निरीक्षक भारत जाधव यांच्या नेतृत्वात कारवाई पथकातील भूपेंद्र थोरात,दिगंबर जाधव,संदीप ताले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
0 Comments