अमरावती-प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान द्वारा आयोजित अमरावती आमदार सांस्कृतिक महोत्सव २०२५ ला आज दिनांक २४ जानेवारी २०२५ पासून मोठ्या थाटात सुरुवात झाली. तीनदिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी सिने अभिनेत्री डेझी शाह (जय हो फेम ) यांची विशेष उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरली होती. याप्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्ष आ. सौ. सुलभाताई खोडके,अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अमरावती गार्डन क्लब चे अध्यक्ष डॉ.सि. एम. देशमुख देशमुख , डॉ. भोजराज चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुष्पप्रदर्शनीतील तजेला फुलांप्रमाणे मनमोहक असलेल्या सिने अभिनेत्री डेझी शहा यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. अमरावतीमध्ये येऊन खूप आनंद झाला असून, या उत्कृष्ट आयोजनातून फार काही शिकायला मिळाले, पुष्पप्रदर्शनीतुन सुद्धा पर्यावरण वाचावा चा संदेश मिळाला आहे. मान्यवरांच्या संबोधनातून चांगले विचार मिळाले असून, हेच आपण सोबत घेऊन जात असल्याचे सांगून सुप्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाह यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला.
यावेळी प्रवीण खोडके मेमेरीयल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या संबोधनात कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका विशद केली. विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून अमरावतीचा नावलौकिक आहे. कला, क्रीडा ,साहित्य,सांस्कृतिक या वैभवाचे नेहमीच जतन करून नेहमीच अमरावतीकरांना विविध कला-क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची बहारदार मेजवानी दिली आहे.अमरावती शहरातील स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुणे , मुंबई सारख्या महानगराच्या धर्तीवर अमरावतीमध्ये सुद्धा सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन होत असल्याने या महोत्सवातील सहभागी स्पर्धक आज देशपातळीवर तसेच चित्रपट सृष्टीत सुद्धा कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे.
अमरावतीचे सांस्कृतिक क्षेत्र असेच प्रगल्भ होण्यासाठी आता आपल्याला हवाहवासा महोत्सव नव्या रंगात -व जोशात आपल्या भेटीला आला आहे. तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम राहणार असून कले सोबतच आपल्या सभ्यता व संस्कृतीची जोपासना करणे हाच महोत्सवाचा उद्देश असल्याचे आमदार महोदयांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त अमरावती शहर नवीनचंद्र रेड्डी व मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सुद्धा आपल्या संबोधनातून आयोजनाची प्रशंसा केली. अमरावतीचा सांस्कृतिक वारसा अधिक प्रगल्भ करणारा हा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमरावती गार्डन क्लब द्वारा आयोजित भव्य पुष्प प्रदर्शनातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवर अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व गुणवंतांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी सिने अभिनेत्री डेझी शाह, आ.सौ.सुलभाताई खोडके यांचेसह सर्व मान्यवर अतिथींनी पुष्पप्रदर्शनी व महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचे फीत कापून उदघाटन केले. तसेच प्रदर्शनातील पुष्प सजावट व आकर्षक कुंड्यांची पाहणी केली. महोत्सवाच्या उदघाटना नंतर लगेच स्वरशोध हिंदी-मराठी सिने गीतगायन स्पर्धेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.शनिवारी महिलांसाठी खास हळदी कुंकू व विविध कार्यक्रम होणार आहे, स्वर-शोध मध्ये दुसरी फेरी रंगणार आहे. विविध स्टॉलवर वस्तूंची विक्री तसेच खाद्य पदार्थांचे स्टॉल ही लावण्यात आले आहेत. रविवारी समूह नृत्य स्पर्धा व नंतर बक्षीस वितरणाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. सर्व अमरावतीकरांनी या सर्व कार्यक्रमांचा आनंद लुटावा, असे आवाहन प्रविण खोडके मेमेरीयल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले आहे.
0 Comments