अमरावती- भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून ‘घर घर संविधान’ उपक्रम सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज सकाळी इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. सर्व मान्यवर व उपस्थितांनी यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. तसेच उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, सहायक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर तसेच विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
घर घर संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग व अन्य शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बाईक रॅलीचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी हवेत फुगे सोडून रॅलीला सुरवात करण्यात आली.
भारतीय राज्यघटने बाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्य शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत, यासाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा ,शासन मान्यता प्राप्त अनुदानित, अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्य, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी घर घर संविधान हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
बाईक रॅलीच्या समारोप प्रसंगी संविधान मसुदा समितीचे सदस्य डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले.यावेळी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी मानले.
0 Comments