Ticker

6/recent/ticker-posts

महसूल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ; क्रीडा स्पर्धातून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल- डॉ. किरण पाटील

 

 बुलढाणा- महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा तसेच शारिरीक तंदुरुस्तीसह त्यांच्यातील कला गुणांना आपल्या व्यस्त कामामुळे समाजासमोर आणता येत नाही.  क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन त्यांना या कला गुणांना समोर आणण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

 

महसूल विभागाच्यावतीने दोन दिवशीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रिडा संकुल येथे करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी महसूल समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी भुसंपादन राजेंद्र पोळ, सुरेश थोरात, अजिंक्य गोडगे, उपजिल्हाधिकारी निवडणूक सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, शैलेश काळे, शरद पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर तसेच सर्व तहसिलदार, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, महसूल प्रशासन शासनाचा कणा आहे. शासनाच्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचे व नागरिकांच्या समस्या व अडीअडचणींचे निराकरण करण्याची जबाबदारी महसूल कर्मचाऱ्यांवर असते. अशा व्यस्त व ताणतणावाच्या कामातून विरंगुळा मिळावा, शारिरीक तंदुरुस्तीसह कला गुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा त्यांच्यासाठी महत्वाची ठरेल. कर्मचारी खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून जिल्ह्याचे नाव विभाग व राज्यस्तरावर नावलौकिक करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

अपर जिल्हाधिकारी श्री. शेलार म्हणाले की, क्रिडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यास शारिरीक तंदुरुस्ती बरोबर मानसिक तंदुरुस्ती मिळते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या खेळामध्ये सहभाग नोंदवून आपल्या सहकारांनाही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर  महोत्सवाचे उद्घाटन दिप प्रज्वलनाने करण्यात आले. जिल्ह्यातील महसूल उपविभागनिहाय पथकाव्दारे शानदार पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेची सुरुवात डॉ. पाटील यांनी क्रिकेट खेळून केली. यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची रुपरेषा व महत्त्व विशद केले. संचालन तहसिलदार वृशाली केसकर व ग्रामविकास अधिकारी शिवानंद वाकदकर यांनी केले.

 

या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय कार्यालय, बुलढाणा, मलकापूर, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद या महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी  सहभाग घेतला होता. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, थ्रो-बॅाल, खो-खो, रिंग टेनिस, व्हॅालिबॅाल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दीबळ, कॅरम या खेळाचा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग असणार आहे.

Post a Comment

0 Comments