शंकर जोगी / विदर्भदूत वृत्त अकोला: जिल्ह्यातील दहीहांडा पोलिस स्टेशनच्या प्रफुल्ल दिंडोकार नामक शिपायाला लाचेची रक्कम घेत असताना अकोला एसीबीच्या पथकाने २९ जानेवारी रोजी रंगेहाथ पकडल्या प्रकरणी त्यांच्यावर त्याच पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आज न्यायालयात हजर केले असता आरोपीला ३१ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी अप.क्र. ४०/२०२५, कलम ०७,७ (अ) भ्रष्टाचार अधिनियम १९८८ अन्वये आरोपी प्रफुल्ल जनार्दन दिंडोकार(३३) ब.नं.२३४७ याने याची ८००० रूपये लाच रक्कम स्विकारल्याच्या प्रकरणात दि.३१.०१.२०२५ पर्यंत सखोल तपास करण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे.
या प्रकरणात लाचलुचत प्रतिबंधक विभाग अकोलाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी आरोपीला दि.२९.०१.२०२५ रोजीचे या प्रकरणात अटक करून याला पोलीस कोठडीमध्ये पाठविण्याबाबत रिमांड सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी अकोट सत्र न्यायालयात दाखल केला व युक्तीवाद केला की, या प्रकरणातील फिर्यादी प्रशांत पडोळे रा.वरूळ जउळका ता.अकोट जि.अकोला याने दि.२०.०१.२०२५ रोजी एसीबी कार्यालय अकोला येथे तकार दिली की, त्याचे परिवाराविरूध्द दहिहांडा पो.स्टे. येथे अदखलपात्र गुन्हयाची नोंद असून, हे प्रकरण निपटून टाकण्याकरिता या प्रकरणात त्यांच्याकडे १०,००० रूपयांच्या लाचेची मागणी आरोपी करित आहे. दि.२०.०१.२०२५ रोजी शासकीय पंचां समक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. तसेच दि. २७.०१.२०२५ रोजी दहिहांडा येथे दहिहांडा दर्यापूर रोडवरील गोयंका हार्डवेअरच्या बाजूला पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता,आरोपी पोलीस अंमलदार प्रफुल दिंडोकार याने प्रकरण निपटून टाकण्याकरिता १०,००० रूपये लाच रक्कमेची मागणी करून, तडजोडी अंती ८००० रूपये लाच रक्कमेची मागणी करून सदर रक्कम दि.२८.०१.२०२५ रोजी घेवून येण्याचे सांगितले व त्याप्रमाणे दहिहांडा दर्यापूर रोडवरील हॉटेल यशवंत बार जवळ शासकीय पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी पोलीस शिपाई प्रफुल दिंडोकार याचे सांगण्यावरून खाजगी इसम शंकर तरोळे याने ८००० रूपयाच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने त्याला रंगेहात पकडण्यात आले. वरील प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी पोलीस शिपाई याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींकडून महत्वाचे कागदपत्रे तसेच फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांकडून दाखल प्रकरणाची कागदपत्रे जप्त करणे बाकी आहे. आरोपींचे नैसर्गिक आवाजाचे नमूने घेवून परिक्षणाकरिता पाठविणे बाकी आहे. साक्षीदार निष्पन्न करून त्यांचे जाब जबाब नोंदविणे बाकी आहे. या प्रकरणात आणखी इतर कोणाचा सहभाग आहे वा कसे याबाबत सखोल तपास करण्याकरिता व गुन्हयाचा तपास प्राथमिक स्तरावर असल्याने आरोपीची दि. ३१.०१. २०२५ पावेतो पोलीस कोठडी रिमांडची आवश्यकता आहे असा युक्तीवाद या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी प्रफुल दिंडोकार पोलीस शिपाई दहिहांडा याची या प्रकरणात दि. ३१.०१.२०२५ पावेतो पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्याचा आदेश पारित केला आहे.
0 Comments