Ticker

6/recent/ticker-posts

"आत्मनिर्भर व विकसित भारतासाठी तरुणाईने खेड्याकडे वळणे गरजेचे - कुलगुरू डॉ. शरद गडाख"



Akola= अलीकडे युवा वर्ग विशेषतः ग्रामीण भागातील तरुणाईची पाऊले शहराकडे वळत असून गावातील चैतन्य हरवत चालल्याचे चित्र असून गावातच रोजगार स्वयंरोजगाराच्या आणि शिक्षणासह  औद्योगिक विकासाच्या संधी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण होईल आणि युवा पिढीचे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखता येणे शक्य होईल असा आशावाद व्यक्त करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी शेतीचे शिक्षण घेणाऱ्या कृषी पदवीधारकांच्या स्वतःच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कार्यकुशलतेचा व्यावसायिक वापर करून कृषि उद्योजक बनविण्यासह हायटेक अग्रीकल्चर गावोगावी स्थापत आपल्या गावाच्या शाश्वत विकासासाठी गरजेनुसार शासकीय, निमशासकीय किवा इतर विभागांची मदत घेत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात "मॉडेल व्हिलेज" निर्मिती साधताना प्राधान्याने विद्यापीठ प्रक्षेत्र अधिक आर्थिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून विकसित करीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर गावे व विद्यापीठ साकारण्याकडे प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन केले. 76 व्या गणतंत्र दिनाचे प्रसंगी विद्यापीठ मुख्यालयी जाहीर संबोधनात उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अकोला येथील मुख्यालयी आयोजित “प्रजासत्ताक दिन समारंभात” पुढे बोलतांना डॉ. गडाख यांनी देश सर्वार्थाने विकसित होण्यासाठी गाव खेड्यांचा शाश्वत विकास हि प्राथमिकता असून कृषी-अकृषी विद्यापीठा सह सर्व शासकीय-निमशासकीय विभाग, सहकारी- सेवाभावी- खाजगी संस्थानी एकत्र येत गावांच्या गरजा लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने नियोजन केल्यास सर्व संपन्न खेडे निर्माण होईल असे आवर्जून सांगितले. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ निर्मित कृषि निविष्ठा व तत्सम प्रक्रियायुक्त उत्पादने विक्री केंद्र स्थापन करीत  शेतकरी हित साधताना विद्यापीठ संपर्कातील प्रयोगशील, प्रगतीशील शेतकरी बंधू- भगिनीचा तथा शेती विकासात क्रियाशील कृषि पदवीधरांचा कार्योल्लेख दर्शविणाऱ्या फ्लेक्स संपूर्ण विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यापीठ प्रक्षेत्रावर झळकाविण्यात आले असल्याचे कार्योत्तर गौरवपूर्ण उदगार सुद्धा  आपल्या सर्वसमावेशक संबोधनात काढले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सर्वच विभागांनी आपले सर्वोत्तम योगदान देत आपले कर्तव्य बजावीत  शिक्षण, संशोधनासह कृषी विस्तार विषयक कार्य निरंतर सुरु ठेवले असून विद्यापीठाच्या राष्ट्रीय मानांकनात अजून आघाडी घेण्यासाठी प्रयत्नांची गरज देखील अधोरेखित केली. 

आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण, भावपूर्ण भाषणात कुलगुरू डॉ. गडाख यांनी शेती आणि शेतकरी केंद्र बिंदू मानून आपले सर्वोच्च योगदान देणाऱ्या समस्त भूतपूर्व कुलगुरू,शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आपणा सर्वाचे अभिनंदन करताना विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार विषयक कार्यासाठीचा रोडमॅप उपस्थितांना सादर केला. 

 कार्यक्रम स्थळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट, विद्यापीठ सुरक्षा विभाग आदींनी कुलगुरूना मानवंदना दिली व शिस्तबद्ध मार्च पास नंतर कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी राष्ट्रध्वज फडकाविला व राष्ट्रगीत तथा राज्य गीतानंतर सर्वाना संबोधित केले. 

 याप्रसंगी सौ. मंदाकिनी शरद गडाख, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, विद्यापीठ अभियंता इंजि. सुनील थोटांगे यांच्यासह विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता,सहयोगी अधिष्ठाता,विभागप्रमुख, शास्त्रज्ञ,अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. 

Post a Comment

0 Comments