Ticker

6/recent/ticker-posts

आता कृषि योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक, सीएससी केंद्रावर काढता येणार ओळख क्रमांक

 

अमरावती, दि. 24 : जिल्ह्यात केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शासनाच्या सर्व योजनांचे लाभ आणि सहभाग मिळविण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रातून शेतकरी ओळख क्रमांक काढावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून कृषि क्षेत्रातील डेटा आणि डिजीटल सेवांच्या उपयोगाने शासनाच्या विविध योजना लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यत पोहोचण्यात येणार आहे. अॅग्रीस्टॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक देण्याची सुविधा नागरी सुविधा केंद्रात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रात सातबारा, आठ अ आणि आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईलसह संपर्क साधणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार आहे. ओटीपी नमूद केल्यानंतरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नोंदणी झाल्यावर शेतकरी ओळख क्रमांक त्याच मोबईल क्रमांकावर प्राप्त होणार आहे.

शेतकरी ओळख क्रमांक अत्यंत महत्वाचा असून शेतकऱ्‍यांनी जपून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ शेतकरी ओळख क्रमांकानुसार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. भविष्यातील प्रत्येक योजनेमध्ये सहभागी अथवा लाभ मिळविण्याकरीता शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे.

कृषि क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण योजना योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत जलद गतीने पोहचवून कृषि क्षेत्राचा विकासासाठी अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने शेतकरी ओळख क्रमांक काढावा, अडचण आल्यास गावाच्या तलाठ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments