राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची कारवाई
शंकर जोगी / विदर्भदूत वृत्त अकोला : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा कृती दलाकडून बालमजुरीतून बालकांची सुटका व पुनर्वसन मोहिम राबविण्यात येत आहे. त्यात गांधीग्राम ते चोहोट्टा बाजार रस्त्यावरील वीट कारखान्यातील तीन बालमजुरांची बुधवारी सुटका करण्यात आली.
जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांच्या मार्गदर्शनात ३१ मार्चपर्यंत जिल्हाभर मोहिम राबविण्यात येणार आहे. दहिहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालकामगार प्रथेविरुद्ध धाडसत्राचे नियोजन काल करण्यात आले. गांधीग्राम ते चोहोट्टा बाजार रस्त्यावरील एका वीटभट्टी कारखान्यात सुमारे १४ वर्षांची तीन अल्पवयीन विटा उचलण्याचे काम करताना दिसून आली. कृती दलाच्या कर्मचा-यांनी तात्काळ त्या बालकांना कामातून मुक्त करून समुपदेशन केले. त्यामधील दोन बालके ही मध्यप्रदेशातील व एक बालिका अकोला जिल्ह्यातील असल्याचे आढळले. त्यानुसार दहीहांडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) ७९ कायदा २०१५, भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३, १४६ अन्वये वीटभट्टी कारखान्याच्या मालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तिन्ही बालकांना बालकल्याण समितीसमक्ष उपस्थित करण्यात आले. बालकल्याण समितीने बालकांच्या पालकांना ताकीद देऊन बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हमीपत्र लिहून घेण्यात आले.
सहायक कामगार आयुक्त राहुल काळे यांच्या मार्गदर्शनात प्रथम श्रेणी दुकान निरीक्षक अर्चना कांबळे, अमर खेतकडे, सुरेंद्र लोखंडे, सोमनाथ पिंपरे, नवनाथ कोकाटे, धनश्री तायडे, ॲक्सेस टू जस्टीस, च्आयएसडब्ल्यूएसज्चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये यांनी कामगिरी बजावली. अल्पवयीन बालके कोठेही काम करताना दिसल्यास तात्काळ चाईल्ड लाईन १०९८ अथवा पोलीस हेल्पलाईन ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन पाटणकर यांनी केले.
0 Comments