अध्यक्षपदी डॉक्टर सुकेश झंवर यांची अविरोध निवड
भाईंजीच्या मार्गदर्शनात विश्वास आणि सहृदयतेच्या बळावर सेवारथ पुढे नेणार - डॉ. सुकेश झंवर
बुलढाणा= बुलडाणा अर्बन या नावातच ग्राहकांचा विश्वास सामावलेला आहे. राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी यांच्या कल्पकतेतून राज्य, देश नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातीकीर्त असलेल्या बुलडाणा अर्बनचा हा सेवारथ ह्याच विश्वासाने सहृदयतेच्या बळावर आणखी पुढे नेणार अशी ग्वाही नव्यानेच निवड झालेले बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी दिली आहे.
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बुलडाणा अर्बन संस्थेच्या अध्यक्ष म्हणून डॉ.सुकेश झंवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुलडाणा अर्बनने कायम ग्राहक सेवा व सभासद हिताला प्राधान्य दिले आहे. १५ ऑगस्ट १९८६ साली राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सातत्याने नव्या - नव्या कल्पना आणि परिश्रम सहकारांची साथ शिवाय शब्द, संयम, वेळ आणि समर्पण या चतु:सूत्रीवर काम केल्यामुळे भाईजींच्या नेतृत्वात बुलडाणा अर्बनने "सहकाराचा गोवर्धन"एक हाती उचलून धरला आहे.
बुलढाणा अर्बनची धुरा आता नव्या कर्णधाराकडे सोपवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संस्थेचे सीएमडी म्हणून काम करत असलेले डॉक्टर सुकेश झंवर यांची अविरोध निवड पार पडली आहे. राधेश्याम चांडक (भाईजी) यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. २७ जानेवारी रोजी ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी( बुलडाणा) डॉ.किरण पाटील होते. तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नानासाहेब चव्हाण (जिल्हा उपनिबंधक बुलडाणा ), सहाय्यक निबंधक गजानन आमले व महेश कृपालानी यांनी काम पाहिले.
१६ लाख ४३ सभासद संख्या असलेल्या बुलढाणा अर्बन ही प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी या ब्रीदाप्रमाणे आपले काम करत आहे. केवळ पतपुरवठा न करता "सहकारातून लोकोद्धार"साधण्यावर भाईजींनी भर दिला. भाईजींच्याच मार्गदर्शनात सर्वसामान्य सभासदांच्या विश्वासाच्या बळावर हा सेवारथ पुढे नेणार असल्याचे अभिवचन अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांनी दिले.यावेळी उपाध्यक्ष म्हणून श्री विनोद केडिया यांची देखील अविरोध निवड करण्यात आली.
हाडाचे अर्थतज्ञ ! डॉ सुकेश झंवर यांचा जन्म यवतमाळ येथे १०/१०/१९७५ रोजी झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळ येथे झाले.त्यानंतर नागपूर च्या प्रतिष्ठीत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.पुर्ण केले. त्यानंतर प्रवरानगर येथे आर्थोपेडिक (एम.एस.) चे शिक्षण घेतले.पुढील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जर्मनी येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी जाॅईंट रिप्लेसमेंट मध्ये प्राविण्य मिळवले. उच्चविद्या विभूषित असलेले डॉक्टर सुकेश झंवर यांनी सहकार क्षेत्रात हाडाचे अर्थतज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सुकेश झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, या निर्णयामुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आर्थिक मजबुतीसह तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यात मोठे यश संपादन केले आहे. संकटसमयी मदतीचा हात देण्याचा त्यांचा स्वभाव, गरजूंना वेळोवेळी आधार देण्याची वृत्ती, आणि नेतृत्वगुणांमुळे ते देश-विदेशात ओळखले जातात. त्यांच्या निवडीने संस्थेच्या सभासदांमध्ये आणि हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
0 Comments