रांची | रांचीतील एका महिलेने लसीकरण मोहिमेदरम्यान कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस हा कोवॅक्सिनचा घेतला होता. काही दिवसानंतर जेव्हा ही महिला लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गेली, त्यावेळी या महिलेला कोवॅक्सिन ऐवजी कोविशिल्डचा डोस देण्यात आला.
यानंतर या महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती पुढे आली आहे. शीला देवी असं या महिलेचे नाव असून, ती रांचीमधील शिवाजी नगर येथे राहते.
प्राप्त माहितीनुसार, ही महिला लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रांचीतील बरियातू रोड येथील एडवांस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेली होती. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला कोव्हॅक्सिनऐवजी कोविशल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
या महिलेचा मुलगा चंदन याने सांगितल्याप्रमाणे, लस घेऊन आल्यानंतर आईला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली.
यानंतर लगेचच या मुलाच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बरियातू रोड येथे ही घटना घडली आहे.
यावरून या महिलेच्या कुटूंबियांनी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये चांगलाच गोंधळ घातला. याबद्दल पोलिसांना कळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कुटूंबियांना शांत केले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
0 Comments