बुलडाणा | आयुष्यात ठरविलेले धेय्य साध्य करण्यासाठी वाट्टेल ती मेहनत घेण्याची अनेकांची तयारी असते. आपली बुद्धीमत्ता आणि समाजासाठी काहीतरी करून दाखविण्याची जिद्द व्यक्तीला साता समुद्रापार घेऊन जाते. आणि व्यक्तीच्या किर्तीचा सुहास हा त्याच्या मायदेशी देखील पसरू लागतो.
अशाच एका धेय्यवेड्या तरुणाने विदर्भाचे नाव जागतिक पातळीवर नेले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पिंपरी या छोट्याश्या गावातील या तरूणाने ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठित असलेली चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवून आपल्या गावाचे नाव उंचावले आहे.
राजू आत्माराम केंद्रे असं या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी जे युवक युकेमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात, अशा जगभरातील 160 देशातील युवा नेतृत्व करणाऱ्या तरुणांसाठी चेव्हेनिंग ही स्कॉलरशीप दिली जाते.
ही स्कॉलरशीप फॉरेन कॉमनवेल्थ डिपार्टमेंटकडून विद्यार्थ्यांना दिली जाते. जगात प्रतिष्ठित असलेल्या या स्कॉलरशिपसाठी विदर्भातील राजु केंद्रेची निवड झाली आहे.
या स्कॉलरशिप अंतर्गत या तरूणाला जवळपास 45 लाखांपर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी जगभरातील 19 नामांकित विद्यापीठांमध्ये राजुची निवड झाली आहे.
यामुळे राजू आता त्याला हव्या त्या विद्यापीठामध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू शकणार आहे. जिल्हा परिषद, मुक्त विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायंस, मुख्यमंत्री फेलोशिप, समाजकार्य महाविद्यालय आणि आयपॅक असा प्रवास करत राजूने चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळविली आहे.
ज्या विद्यापीठात राजू प्रवेश घेईल त्याची पूर्ण फी, खाणे आणि राहण्याचा खर्च, या स्कॉलरशिपमधून केला जाणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून राजू केंद्रे हा एकलव्य चळवळीत काम करत आहे. ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी हक्काची मार्गदर्शन संस्था म्हणून एकलव्य चळवळ काम करत आहे. या चळवळीतील 125 विद्यार्थी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत शिकत आहेत.
तळागाळातील तरूणांना एकत्र आणत, शाहू, फुले, आंबेडकर, आदींचा वारसा पुढे नेण्यासाठी दोन दशकात विद्यापीठ साकार करण्याचे राजू केंद्रे याचे ध्येय आहे. समाजाप्रती असणारी चांगली भावना आणि सत्कार्य करण्याच्या त्याच्या जिद्दीमुळे आज त्याने हे यशोशिखर गाठले आहे.
0 Comments