नागपूर | मुलाचा वाढदिवस आनंदाने बाहेर शांततेत साजरा व्हावा, या हेतूने गेलेल्या बाप लेकाचा मृत्यू झाल्याने कुटूंबावर दुःखाची छाया पडली आहे. ही घटना नागपूरमधील झिलपी तलावात घडली. या घटनेने मृतांच्या परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
यशोधरानगर मधील टिपू सुलतान चौकजवळील रहिवासी शेख कुटुंबाने आपल्या मुलाचा वाढदिवस निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार ते दुचाकीने काही दूर असलेल्या झिलपी तलावावर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले.
लहान मुलगा असिफ याचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघेही बाप-लेक मोहगाव तलावातील पाण्यात उतरले. अशातच पाण्याची पातळी न समजल्याने मुलाचे वडील तलावात पोहता पोहता पाण्यात बुडू लागले. पतिचा जीव वाचविण्यासाठी घाबरलेल्या पत्नीने लगेच तलावात उडी घेतली. आणि पतिला वाचविण्यासाठी संघर्ष करू लागली.
वडिल बुडत असल्याचे पाहून मोठा मुलगा शहबीन यानेही पाण्यात उडी घेतली. परंतू नियतीला मात्र काही औरच हवे होते. वडिलांना वाचविण्यासाठी गेलेल्या
12 वर्षीय मुलगा शहबीन अब्दुल शेख आणि 35 वर्षीय वडील अब्दुल आसिफ शेख या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेत सुदैवाने अब्दुल यांच्या पत्नी आसमा यांचे प्राण थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती हिंगणा पोलीसांना मिळताच, बचाव पथकासह त्यांनी तलावाकडे धाव घेतली. पथकाने केलेल्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
न्यूज 18 लोकमतने या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अंकाऊंटवर टाकला आहे.
0 Comments