पालघर | देशात कोरोना महामारीने कित्येक कुटूंब उध्वस्त केलीत. अनेकांचा रोजगार हिरावला, अनेकांना बेघर केले, अनेकांवर उपासमारीची वेळ देखील आणली आहे. फक्त सामान्यच नाही तर अनेक लहान मोठ्या कलाकारांवर देखील ही वाईट वेळ आलेली दिसून येत आहे. अशीच दुर्दैवी वेळ विदर्भातील एका गझलकारावर आली आहे. यातील अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांना त्यांच्या 90 वर्षाच्या आईसह रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.
मदन काजळे असं या गझलकाराचे नाव आहे. विदर्भातील मराठी भाषिक असलेले मदन हे उत्कृष्ट उर्दू गजलकार आहेत. परंतू असे असूनही सततच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर कामधंदा, पैसा, घरभाडे नसल्याने ही बिकट परिस्थिती ओढवली आहे.
या गझलकाराने सुरेश वाडकर, देवकी पंडित यांच्यासोबत देखील काम केले आहे. 2010 साली त्यांना सुरेश भट स्मृती पुरस्कार देखील देण्यात आला. मोहम्मद रफी, किशोर कुमार, उदित नारायण, रुपकुमार राठोड यांच्यासह अनेक गीतकारांची गाणी ते आपल्या आवाजात सादर करतात. परंतू कोरोनामुळे आज त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सध्या वसई विरार महापालिकेच्या निवारा केंद्रात आश्रय दिल्याचे सांगण्यात येत आहे.
0 Comments